मुंबई महापालिकेत ठाकरे गट सक्षम विरोधकाची भूमिका बजावणार - किशोरी पेडणेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 February 2026

मुंबई महापालिकेत ठाकरे गट सक्षम विरोधकाची भूमिका बजावणार - किशोरी पेडणेकर


मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून मराठी उमेदवार देण्यात आल्याने ठाकरे गटाने या निवडीवर कोणताही अपशकून न करण्याची भूमिका घेतली आहे. गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, “आम्ही आकड्यांचे गणित मान्य केले आहे. सत्ता कोणाचीही असो, ठाकरे गट सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल,” असा ठाम संदेश दिला.

प्रत्येक नगरसेवकाने कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता आपल्या विभागातील प्रश्न सभागृहात ठामपणे मांडावेत, अशी ग्वाहीही पेडणेकर यांनी दिली. विरोधी पक्षाची भूमिका आमच्यासाठी नवीन नाही. सत्तेत असतानाही अनेकदा विरोधी भूमिका घ्यावी लागली आहे. त्यामुळे आता ही जबाबदारी अधिक सजगपणे पार पाडली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. महापौरपदासाठी रितू तावडे आणि शीतल गंभीर या दोन नावांची चर्चा होती; मात्र अंतिम टप्प्यात रितू तावडे यांच्यावर एकमत झाले. यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने या निवडीकडे विशेष लक्ष लागले होते.

उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ उपमहापौर म्हणून राहील, अशी माहिती दिली.

महापौरपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर रितू तावडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. “मी स्वतःला मुंबईची सेवक मानते. सभागृहाची गरिमा राखून पक्षभेद विसरून सर्व नगरसेवकांनी मुंबईच्या हितासाठी एकत्र काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई महानगरपालिकेची महापौर निवडणूक ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. भाजपकडून प्रथमच महिला चेहऱ्याला महापौरपदाची संधी देण्यात आल्याने रितू तावडे या भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे गट सत्तेत, तर ठाकरे गट सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असे नवे राजकीय समीकरण स्पष्ट झाले आहे. येत्या काळात सभागृहातील कामकाजावर याचे पडसाद कसे उमटतात, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS