मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेची कठोर कारवाई; जप्ती नोटिसा बजावण्यास सुरुवात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 February 2026

मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेची कठोर कारवाई; जप्ती नोटिसा बजावण्यास सुरुवात


मुंबई - मालमत्ता कर भरण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम २०३ अन्वये संबंधितांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात येत असून, निर्धारित मुदतीत कर न भरल्यास मालमत्तेवर जप्ती आणि पुढील टप्प्यात लिलावाची कारवाई करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या या कारवाईमागील उद्देश प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होऊ न देणे, कर वसुलीला गती देणे आणि नागरी सुविधा व पायाभूत सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक महसूल सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे सर्व मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरणा करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, तसेच सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली करसंकलन मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सातत्याने आवाहन करूनही कर न भरणाऱ्यांविरोधात जप्ती व अटकावणीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत भूखंड, निवासी व व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे तसेच औद्योगिक गाळ्यांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १ एप्रिल २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तब्बल ५,४२६ कोटी ८१ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. उर्वरित दोन महिन्यांत वसुली वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असून विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे.

कलम २०३ अन्वये नोटीस बजावल्यानंतरही कर न भरल्यास कलम २०४, २०५ आणि २०६ अंतर्गत प्रथम संबंधित मालमत्तेतील चलमाल जप्त करून त्याचा लिलाव केला जाणार आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या याचिका क्र. २५९२/२०१३ मधील अंतरिम आदेशानुसार, अपेक्षित कर वसूल न झाल्यास संबंधित मालमत्तेचाही लिलाव करण्यात येणार असल्याचे नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, १० फेब्रुवारी २०२६ रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात आलेल्या ‘टॉप टेन’ थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मेसर्स कमला मिल्स (₹१२.०१ कोटी), मेसर्स सुमेर कॉर्पोरेशन चांदिवली फार्म्स (₹११.९८ कोटी), मेसर्स ट्रान्सकॉन शेठ क्रिएटर्स (₹११.९८ कोटी), मेसर्स फोरमोस्ट रिअल्टर्स प्रा. लि. (₹११.९१ कोटी), मेसर्स श्री साई ग्रुप (₹११.३१ कोटी), मेसर्स अॅकॉर्ड बिल्डर्स (₹११.२० कोटी), मेसर्स सुमेर कॉर्पोरेशन (₹१०.६३ कोटी), मेसर्स आमीर पार्क्स अँड अॅम्युझमेंट प्रा. लि. (₹९.५६ कोटी), मेसर्स इम्तियाज अब्दुल गफार (₹२.५४ कोटी) आणि अमीनुल्लाह जहिदुल्लाह (₹२.५१ कोटी) यांचा समावेश आहे.

महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई कायम राहणार असून, सर्व संबंधितांनी विहीत मुदतीत कर भरणा करून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई टाळावी.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS