महापालिकेच्या बाल चित्रकला स्पर्धेत ८६ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 March 2026

महापालिकेच्या बाल चित्रकला स्पर्धेत ८६ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या शिक्षण विभागातर्फे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शहरातील ५१ उद्याने व मैदानांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल ८६ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत रंगांची उधळण केली.

रविवारची सकाळ मुंबईतील विविध उद्यानांमध्ये खऱ्या अर्थाने रंगपंचमीसारखी रंगली. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक विषयांवर कल्पक चित्रे साकारत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.

घाटकोपर (पूर्व) येथील आचार्य अत्रे मैदान येथे महापौर रितू तावडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांच्याशी संवाद साधला. दहिसर, माटुंगा, ग्रँट रोड (पश्चिम) आणि वांद्रे (पूर्व) येथील विविध ठिकाणीही लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत स्पर्धकांचा उत्साह वाढविला. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही विद्यार्थ्यांमध्ये मिसळत त्यांच्या चित्रांचे कौतुक केले.

यंदा स्पर्धेचे १७ वे वर्ष असून पाच गटांमध्ये विविध विषय देण्यात आले होते. ‘माझा चांदोमामा’, ‘मी झाडावर चढतो’, ‘आम्ही परग्रहावर’, ‘माझा आवडता मैदानी खेळ’, ‘पर्यावरण संवर्धन’ अशा कल्पक विषयांवर विद्यार्थ्यांनी सुरेख चित्रे रेखाटली.

स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २० हजार रुपये, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. विभाग स्तरावरही उत्कृष्ट चित्रांना रोख पारितोषिक व पदक देण्यात येणार असून विजेत्यांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून ‘माझी मुंबई’ या संकल्पनेतून शहराविषयीची जाणीव आणि अभिमान अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS