एचपीव्ही लसीकरण मोहिम, मुंबईत सुमारे १.३० लाख मुली लाभार्थी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 March 2026

एचपीव्ही लसीकरण मोहिम, मुंबईत सुमारे १.३० लाख मुली लाभार्थी


मुंबई - देशभरातील १४ वर्षे पूर्ण झालेल्या पण १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते शनिवारी, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अजमेर येथे करण्यात आला.

निकषानुसार मुंबईमध्ये सुमारे १ लाख ३० हजार मुली लाभार्थी असून, पहिल्या टप्प्यात महानगरपालिका शाळांमधील २४ हजार ९३६ मुलींचा समावेश करण्यात आला आहे.

नायर रुग्णालयात महाराष्ट्र स्तरीय प्रारंभ - 
मुंबई सेंट्रल येथील Topiwala National Medical College आणि BYL Nair Charitable Hospital येथे महाराष्ट्रातील मोहिमेचा शुभारंभ पार पडला. १४ वर्षे पूर्ण झालेल्या पाच मुलींना एचपीव्ही लस देऊन मुंबईसह राज्यातील मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात मान्यवरांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला. यावेळी महापौर रितू तावडे यांनी पालकांनी भीती न बाळगता आपल्या मुलींना ही सुरक्षित लस द्यावी, असे आवाहन केले.

३ महिन्यांची विशेष मोहीम - 
ही लसीकरण मोहीम पुढील तीन महिने विशेष स्वरूपात राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २३६ आरोग्य केंद्रे, २७ प्रसूतिगृहे, १६ सर्वसाधारण रुग्णालये आणि ५ वैद्यकीय महाविद्यालये अशा एकूण २८४ आरोग्य संस्थांमध्ये लस उपलब्ध असणार आहे.

‘गार्डसिल-४’ लसीचा वापर - 
या मोहिमेत लाभार्थी मुलींना ‘गार्डसिल-४’ ही एचपीव्ही लस ०.५ मिली मात्रेत डाव्या दंडावर स्नायूमध्ये दिली जाणार आहे. लसीकरणानंतर डाव्या तर्जनीच्या नखावर मार्किंग केले जाणार आहे. हे लसीकरण ऐच्छिक असून पालकांची संमती आवश्यक आहे. प्रतिकूल घटनांसाठी प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी व उपचार सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत.

कर्करोग प्रतिबंधासाठी महत्त्वाचे पाऊल - 
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो आणि लसीकरणाने टाळता येणारा एकमेव कर्करोग मानला जातो. भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२२ मधील आकडेवारीनुसार भारतात प्रति १ लाख महिलांमागे १७.७ टक्के प्रादुर्भाव नोंदवला गेला आहे.

संभाव्य सौम्य दुष्परिणाम - 
लसीकरणानंतर ताप, डोकेदुखी किंवा इंजेक्शनच्या ठिकाणी सूज अशी सौम्य लक्षणे २-३ दिवस दिसू शकतात. गंभीर आजार असलेल्या, यीस्टची अॅलर्जी असलेल्या किंवा गर्भवती मुलींना ही लस देण्यात येणार नाही.

या मोहिमेसाठी २६२ वैद्यकीय अधिकारी, १००८ परिचारिका, ४४२८ आशा सेविका व आरोग्य स्वयंसेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, मुंबईत मोहीम प्रभावीपणे राबविण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS