बेस्ट कर्मचाऱ्यांना अर्धा रोख-अर्धा ECS पगार; विरोधी सदस्यांचा तीव्र आक्षेप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 March 2026

बेस्ट कर्मचाऱ्यांना अर्धा रोख-अर्धा ECS पगार; विरोधी सदस्यांचा तीव्र आक्षेप



मुंबई - बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्धा रोख आणि अर्धा ECS (ऑनलाईन) पगाराच्या पद्धतीवर विरोधी पक्षाच्या बेस्ट समिती सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. या संदर्भात बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव आणि बेस्टचे महाव्यवस्थापक यांना पत्र देऊन ही पद्धत तातडीने बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

विरोधी सदस्य प्रवीना मोरजकर, नितीन नांदगावकर आणि सुनील आहिर यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, पूर्वी बेस्ट कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार रोखीने दिला जात असे, तर नंतर आधुनिक पद्धतीनुसार ECS द्वारे पगार थेट बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली होती. मात्र सध्या अर्धा पगार ऑनलाईन आणि अर्धा रोखीने देण्याची पद्धत सुरू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

काही कर्मचाऱ्यांना पगार घेण्यासाठी दुसऱ्या विभागात जावे लागते, त्यामुळे वेळ वाया जातो. तसेच ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांना रोखीत घेतलेला पगार पुन्हा बँकेत जमा करावा लागतो, तर काही कर्मचाऱ्यांना पगार ऑनलाईन पूर्ण न येत असल्याने कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बेस्टकडे वाहतूक आणि वीजपुरवठा विभागातून येणारी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम योग्य नियोजनाअभावी पडून राहत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यापूर्वी या रकमेची योग्य गुंतवणूक करून बेस्टला व्याज मिळत होते, मात्र सध्या त्या निधीकडे दुर्लक्ष होत असल्याचे विरोधी सदस्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आधुनिक युगात बेस्ट उपक्रमाने पूर्णपणे ऑनलाईन पगार प्रणाली लागू करावी, अशी मागणी विरोधी सदस्यांनी पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS