Chembur accident - बांधकामस्थळी हलगर्जीपणा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे महापौरांचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 February 2026

Chembur accident - बांधकामस्थळी हलगर्जीपणा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे महापौरांचे निर्देश


मुंबई - चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात बांधकामाधीन इमारतीवरून सहा मजूर कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६ रोजी) दुपारी घडली. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर महापौर रितू तावडे (Mayour Ritu Tawde) यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

प्राथमिक माहितीनुसार, ‘आदित्य राज’ या विकासकामार्फत संबंधित इमारतीचे बांधकाम सुरू होते. सातव्या मजल्यावरील कामादरम्यान परांची कोसळल्याने सहा मजूर खाली पडले. त्यापैकी एका मजुराचा मृत्यू झाला असून पाच जखमींवर राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) येथे उपचार सुरू आहेत. एका मजुराची प्रकृती गंभीर असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौरांनी सांगितले की, प्रथमदर्शनी बांधकामस्थळी गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत आहे. कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर झाला का, अभियंता वर्गाची देखरेख होती का, अपघाताच्या वेळी जबाबदार अधिकारी कुठे होते, याची सखोल चौकशी केली जाईल. अशा प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बेजबाबदारपणे काम करणाऱ्या विकासक आणि कंत्राटदारांविरोधात कठोर कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) आणि म्हाडा ( Maharashtra Housing and Area Development Authority)  यांनी बांधकामस्थळांवरील सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, महापौरांनी रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची विचारपूस केली आणि सर्व रुग्णांना आवश्यक ते सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या दुर्घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS