छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात शिवरायांचा भव्य पुतळा उभारा, मिलिंद नार्वेकर यांची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 March 2026

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात शिवरायांचा भव्य पुतळा उभारा, मिलिंद नार्वेकर यांची मागणी


मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या ऐतिहासिक रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाचा तातडीने शुभारंभ करावा, अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

मुंबईच्या ऐतिहासिक विक्टोरिया टर्मिनस (VT) रेल्वे स्थानकाचे नाव सर्वप्रथम १९९६ मध्ये बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) करण्यात आले होते. त्यानंतर जून २०१७ मध्ये नावात ‘महाराज’ हा शब्द अधिकृतरित्या जोडून या स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) असे करण्यात आले. हे स्थानक मध्य रेल्वेचे मुख्यालय असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्येही त्याचा समावेश आहे.

मात्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या स्थानकाला देऊन जवळपास २० वर्षांचा कालावधी उलटूनही येथे शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला नाही, ही खेदाची बाब असल्याचे नार्वेकर यांनी नमूद केले.

या स्थानकात शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी विविध लोकप्रतिनिधी आणि संघटनांकडून सातत्याने राज्य व केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे. दरम्यान, या स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा समावेश करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर २०२५ मध्ये दिली होती.

शिवरायांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी CSMT स्थानकाच्या दर्शनी भागात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाला तातडीने सुरुवात व्हावी, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी नार्वेकर यांनी केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS