बेस्ट समितीत शिवसेना सदस्यांचा आक्रमक पवित्रा; स्मार्ट मीटर, कंत्राटी भरती व पगार पद्धतीवर आक्षेप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 March 2026

बेस्ट समितीत शिवसेना सदस्यांचा आक्रमक पवित्रा; स्मार्ट मीटर, कंत्राटी भरती व पगार पद्धतीवर आक्षेप


मुंबई - बेस्ट समितीच्या आज झालेल्या बैठकीत शिवसेना समिती सदस्यांनी विविध महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले. शिवसेना समिती सदस्य प्रवीणा मोरजकर, नितीन नांदगावकर, सुनील आहिर, सुनील मोरे आणि सचिन पाटील यांनी अध्यक्षांच्या दालनात तसेच समिती बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करत लेखी पत्र दिले.

बैठकीत विद्युत पुरवठा विभागात अदानी कंपनीमार्फत बसवण्यात येत असलेल्या नवीन स्मार्ट मीटरला विरोध दर्शवण्यात आला. या स्मार्ट मीटर संदर्भात हरकत नोंदवत या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच बेस्टमधून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याच्या निर्णयालाही विरोध करण्यात आला. या जागांवर बेस्टच्या प्रतीक्षा यादीतील कर्मचारी वर्गाच्या मुलांना संधी देण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी पत्राद्वारे केली.

याशिवाय बेस्ट कर्मचाऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून मासिक पगारातील काही रक्कम रोख स्वरूपात देण्याच्या पद्धतीवरही आक्षेप घेण्यात आला. या पद्धतीमुळे बेस्ट उपक्रमाचे आर्थिक नुकसान होत असल्याबरोबरच कर्मचाऱ्यांनाही विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सदस्यांनी नमूद केले.

या सर्व मुद्द्यांवर बेस्ट प्रशासनाने पुढील २३ तारखेला होणाऱ्या बेस्ट समिती बैठकीत उत्तर देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सदस्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS