बौद्ध भिक्षूंच्या समर्थनार्थ मुंबई विद्यापीठाच्या विरोधात आक्रोश आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2026

बौद्ध भिक्षूंच्या समर्थनार्थ मुंबई विद्यापीठाच्या विरोधात आक्रोश आंदोलन


मुंबई - मुंबई विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी तथा बौद्ध भिक्षू भदंत विमांसा यांच्या समर्थनार्थ तसेच मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ (मंगळवार 17 मार्च 2026) आझाद मैदान येथे पाली भाषा संवर्धन समिती व जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने निर्धार आक्रोश आंदोलन करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून भदंत विमांसा हे पाली भाषा विभागाच्या संवर्धनासाठी तसेच आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण सत्याग्रह करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांच्यावर अन्यायकारक व अमानुष वागणूक दिली जात असल्याची आंदोलकांनी केली.

या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक, शैक्षणिक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत आझाद मैदान येथे निर्धार आक्रोश आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनादरम्यान भदंत विमांसा यांना तात्काळ न्याय द्यावा, त्यांचा पीएचडी प्रवेश रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तसेच पाली भाषा विभागाचा विकास व संवर्धन करण्यात यावे, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी आझाद मैदान दणाणून टाकले व तसेच मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
आंदोलनादरम्यान भाषण सुरू असताना आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मंत्र्यांची भेट मिळवून देण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे संतप्त आंदोलकांनी संपूर्ण आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले आणि घोषणाबाजीने परिसर दुमदुमून टाकला.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने तात्काळ हालचाल करत शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्याचा निर्णय घेतला.

विधिमंडळाच्या कामकाजात व्यस्त असतानाही शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांची भूमिका गांभीर्याने घेत शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, “मी बौद्ध धम्म गुरुंचा आदर करतो आणि माझ्या घरी त्यांना भोजनदानासाठीही आमंत्रित करत असतो. मुंबई विद्यापीठ हे स्वायत्त संस्थान असले तरी भदंत विमांसा यांचा प्रश्न मी लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन. विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर मी स्वतः विद्यापीठात जाऊन भंतेजींच्या सत्याग्रहस्थळी भेट देईन तसेच मंत्रालयात याबाबत बैठकही बोलावीन,” असे आश्वासन त्यांनी दिले.

या शिष्टमंडळात भंते पूर्ण, सीमा कसबे, वैभव सोनवणे, संतोष गांगुर्डे, इंद्रजीत मोहिते, शैलेंद्र कांबळे आणि सुबोध मोरे यांचा समावेश होता. या आंदोलनामुळे भदंत विमांसा यांच्या प्रश्नाकडे राज्यभरातून लक्ष वेधले गेले असून, लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS