मुंबई क्लीन लीग कार्यक्रमात प्रोटोकॉलचा भंग, उपमहापौरांचा अवमान, कारवाईची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 March 2026

मुंबई क्लीन लीग कार्यक्रमात प्रोटोकॉलचा भंग, उपमहापौरांचा अवमान, कारवाईची मागणी


मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धेच्या नोंदणी कार्यक्रमादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उपमहापौरांचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला अभिनेता अक्षय कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपमहापौर संजय घाडी, आमदार अमित साटम, गटनेते गणेश वटकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मात्र, कार्यक्रमादरम्यान प्रोटोकॉलचे पालन करण्यात त्रुटी झाल्याचे घोले यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. महापौर अनुपस्थित असताना नियमानुसार उपमहापौर हे प्रमुख (पहिल्या क्रमांकावर) असणे अपेक्षित असताना, उपमहापौरांना चौथ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा प्रकार अयोग्य असून शिष्टाचाराला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी प्रशासनाने उपमहापौरांची जाहीर माफी मागावी, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा कार्यक्रमांमध्ये प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी घोले यांनी केली आहे. या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS