
मुंबई - आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर त्या पदवीचे रोजगारात आणि उद्योजकतेत रूपांतर करणे अत्यावश्यक आहे. तांत्रिक ज्ञानासोबत सॉफ्ट स्किल्स, नाविन्यपूर्ण विचार आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सोहळ्यात बोलताना त्यांनी उद्योजकतेच्या वाटेवर चालणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा, असे सांगितले. नफा कमावताना सामाजिक जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भव्य उपस्थितीत ऐतिहासिक सोहळा -
लोकभवन येथील ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यास राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, तसेच मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि हजारो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
‘ग्लोबल स्किल हब’कडे भारताची झेप -
उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी नमूद केले की, पहिल्या दीक्षांत सोहळ्यातील पदवीधर हे केवळ विद्यार्थ्यांचे यश नसून भारताच्या कौशल्याधारित भविष्याचा पाया आहेत. भारताला ‘ग्लोबल स्किल हब’ बनवण्यासाठी उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमात सातत्याने बदल करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ग्रीन एनर्जी आणि डेटा अॅनालिटिक्स यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये पारंगत होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच जपानच्या प्रगतीचा दाखला देत त्यांनी शिस्त, कठोर परिश्रम आणि कामाप्रती निष्ठा या गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
नाविन्य आणि प्रयोगशीलतेची गरज - जिष्णु देव वर्मा
राज्यपाल जिष्णु देव-वर्मा यांनी शिक्षण क्षेत्रात नाविन्यता आणि प्रयोगशीलता जपणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे रोजगाराच्या संधींवर परिणाम होत असताना विद्यार्थ्यांनी बहुआयामी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, पदवी ही शिक्षणाचा शेवट नसून आयुष्यभर चालणाऱ्या शिक्षण प्रवासाची सुरुवात आहे.
‘AI लिव्हिंग लॅब’मधून प्रत्यक्ष प्रशिक्षण - देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देशाचा ‘डेमोग्राफिक डिविडंड’ सक्षम करण्यासाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. ‘एआय लिव्हिंग लॅब’ उपक्रमांतून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्यांवर काम करण्याची संधी दिली जात आहे. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने १०,००० महिलांना एआय प्रशिक्षण देण्यात आले असून, राज्य कौशल्य विकासात आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के वाटा असून, राज्याची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर झपाट्याने प्रगती करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा गौरव - सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी हा सोहळा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यातील स्वप्नांचा सन्मान असल्याचे सांगितले. कौशल्य विकास योजनांमुळे राज्यभरात नव्या संधी निर्माण होत असून, तरुणांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सामाजिक बांधिलकी जपावी, असे त्यांनी आवाहन केले.
आत्मनिर्भर भारतासाठी कौशल्य महत्त्वाचे - मंगल प्रभात लोढा
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याचे काम सुरू आहे. प्राचीन काळी भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जायचे, त्यामागे केवळ कृषी नव्हे तर प्रत्येक घरातील कौशल्य ही मोठी ताकद होती. प्रत्येक कुटुंबातून सूक्ष्म उद्योग उभे राहत होते. हीच परंपरा पुन्हा जोपासण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासन मजबूत असून, आता कौशल्य क्षेत्रात आणखी प्रगती करण्यावर भर दिला जात आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते पहिला दीक्षांत समारंभ पार पडणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे त्यांच्या करिअरला अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वर्गीय रतन टाटा यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या या विद्यापीठातून केवळ तांत्रिक शिक्षणच नव्हे, तर मूल्यांचीही जपणूक होईल. स्वर्गीय जयंतराव सहस्त्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या प्रदर्शन कक्षाचा उल्लेख करत, कौशल्य, नवोपक्रम आणि रोजगार निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील सर्वोत्तम आयटीआय संस्थांचा गौरव करण्यात येत असून, आदिवासी, महिला आणि सर्वसाधारण गटातील प्रत्येकी एक उत्कृष्ट आयटीआयची निवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कौशल्यामुळेच तरुणांचे भविष्य उज्ज्वल होईल आणि महाराष्ट्र कौशल्य क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
२५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या; एआयमध्ये विक्रम -
कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पहिल्याच दीक्षांत सोहळ्यात २५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदव्या व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यापीठाने १०,००० महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण देत नवा विक्रम केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करून विद्यार्थ्यांना जागतिक संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, डिजिटल मार्केटिंग आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रविद्या या क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
उद्योग-सहभागातून कौशल्याला चालना
सोहळ्यानिमित्त आयोजित प्रदर्शनात टोयोटा किर्लोस्कर, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, स्वदेश फाउंडेशन यांसारख्या नामांकित संस्थांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट जोडणारा हा उपक्रम ठरला.
कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पहिल्याच दीक्षांत सोहळ्यात २५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदव्या व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यापीठाने १०,००० महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण देत नवा विक्रम केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करून विद्यार्थ्यांना जागतिक संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, डिजिटल मार्केटिंग आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रविद्या या क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
उद्योग-सहभागातून कौशल्याला चालना
सोहळ्यानिमित्त आयोजित प्रदर्शनात टोयोटा किर्लोस्कर, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, स्वदेश फाउंडेशन यांसारख्या नामांकित संस्थांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट जोडणारा हा उपक्रम ठरला.


No comments:
Post a Comment