डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी घरांची चावी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन, सफाई कामगारांचा सरकारला इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2026

डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी घरांची चावी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन, सफाई कामगारांचा सरकारला इशारा


मुंबई - मुंबईतील सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी (१४ एप्रिल) मालकी हक्काच्या घरांच्या चाव्या वाटप न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव आणि सरचिटणीस वामन कविस्कर यांनी सांगितले की, राज्य सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर कामगारांचा पूर्ण विश्वास असूनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी वाढत आहे.

याआधी २००८ साली घेतलेल्या निर्णयानुसार काही कामगारांना घरे देण्यात आली होती. मात्र त्यानंतर महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केले. दरवर्षी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून वसाहतींची पुनर्बांधणी केली असती, तर आजपर्यंत हजारो सफाई कामगारांना स्वतःचे घर मिळाले असते, असा आरोप युनियनने केला आहे.

सफाई कामगारांनी नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना काळात दिलेल्या योगदानाची आठवणही यावेळी करून देण्यात आली. पूरस्थितीत मदतकार्य, शहरांची स्वच्छता आणि कोरोना काळात जीव धोक्यात घालून दिलेली सेवा या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने आता तरी मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या मागणीसाठी सोमवार, २३ मार्च रोजी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात येणार असून त्यानंतर ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री यांची भेट घेण्याचाही निर्धार युनियनने व्यक्त केला आहे. मोर्चामध्ये सफाई कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर आणि कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई यांनी केले आहे. 

ही बातमीही वाचा ....

घर हक्कासाठी सफाई कामगारांचा एल्गार; २३ मार्चला ‘वर्षा’ बंगल्यावर हजारोंचा मोर्चा

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS