
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील करक येथे अर्जुना मध्यम पाठबंधारे प्रकल्पग्रस्तांना शौचालयाचे अनुदान देण्याच्या नावाखाली आयोजित कार्यक्रमात प्रकल्पग्रस्तांची फसवणूक झाल्याने मोठा गोंधळ उडाला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
अर्जुना प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या जमिनीवर शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपयांच्या धनादेशांचे ३ एप्रिल रोजी वाटप होणार असल्याचा संदेश सरपंचांच्या नावे व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हे धनादेश किरण सामंत यांच्या हस्ते दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. या संदेशामुळे मुंबईसह विविध भागांतून मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त करक येथे दाखल झाले.
कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पाठबंधारे विभागाच्या विश्रामगृहाचे आणि रस्ते कामांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष धनादेश वाटपाच्या वेळी अचानक प्रकल्पग्रस्तांना अर्ज भरून देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर लगेचच चेक मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अधिकारी, कर्मचारी नाराज -
प्रकल्पग्रस्तांकडून अर्ज भरून घेताना स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी गुड फ्रायडेच्या दिवशी सुट्टीच्या काळात बोलावण्यात आल्याने त्याचा राग काढला. आम्ही अर्ज भरून घेणार नाही अशी दमदाटीही केली. अर्ज भरायचे होते तर हे आधी सांगता आले नसते का, अर्ज भरायचे होते तर ते आम्ही मुंबईहूनही भरून पाठवले असते असे प्रश्न उपस्थित करत प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. प्रकल्पग्रस्त संतप्त झाल्यावर पुन्हा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. मुंबईहून मोठी प्रमाणात प्रकल्पग्रस्त आल्याने नाईलाजाने अधिकारी कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत अर्ज भरून घ्यावे लागले.
चुकीची माहिती देऊन गर्दी जमवली -
यामुळे उपस्थितांमध्ये संतापाची लाट उसळली. प्रत्यक्षात सर्वांना नव्हे तर केवळ निवडक प्रकल्पग्रस्तांनाच चेक देण्याचे नियोजन असल्याचे उघड झाले. दूरवरून, विशेषतः मुंबईहून आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी “चुकीची माहिती देऊन केवळ गर्दी जमवली” असा आरोप करत निषेध नोंदवला. नियोजनाचा अभाव आणि चुकीच्या माहितीमुळे प्रकल्पग्रस्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उर्वरितांना टप्प्याटप्प्याने लाभ -
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना आमदार किरण सामंत यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्तांना चुकीची माहिती देण्यात आली आहे. एकूण ३९० लाभार्थ्यांची यादी तयार असून, त्यापैकी केवळ ४१ जणांना सध्या धनादेश देण्यात आले आहेत. उर्वरितांना टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विविध कामांचे उद्घाटन -
राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील अर्जुना धरण हा तालुक्यातील महत्त्वाचा पाटबंधारे प्रकल्प मानला जातो. येथे कार्यरत अधिकाऱ्यांसाठी तसेच येणाऱ्या पाहुण्यांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधांनी युक्त निरीक्षक गृहाची आवश्यकता दीर्घकाळ जाणवत होती. ही गरज लक्षात घेऊन संबंधित विभागाने अत्याधुनिक सुविधा असलेली इमारत उभारली आहे. इमारतीचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला यांची उपस्थिती -
यावेळी अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, तहसीलदार विकास गंबरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, जी. प. सदस्या सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, माजी जी. प. सदस्य आबा आडीवरेकर, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, उपविभागीय अभियंता अमोल बनसोडे, मंडळ अधिकारी पूनम गावीत, करक सरपंच सुरेश ऐनारकर, पांगरी सरपंच अमर जाधव, पाचल सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, विभाग प्रमुख शैलेश साळवी, माजी सरपंच सुनील जाधव यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.


No comments:
Post a Comment