बदली वादाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून विशेष समिती गठीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 April 2026

बदली वादाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून विशेष समिती गठीत


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) मधील अभियंत्यांच्या बदली प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत, काही बदल्या रद्द केल्या असून बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी विशेष समिती गठीत केली आहे. दरम्यान, या प्रकरणात कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे SIT चौकशीची मागणीही जोर धरत आहे.

महानगरपालिकेतील विविध खात्यांमध्ये सुमारे ४,५०० अभियंते कार्यरत असून, अलीकडे करण्यात आलेल्या बदल्यांवर “व्यवहार” आणि “कमिशन”च्या आरोपांची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर सुमारे १२२ बदल्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विरोधकांनी या प्रकरणात थेट आरोप करत, बदल्यांसाठी ‘रेट’ ठरवले जात असल्याचा दावा केला आहे. तसेच, या व्यवहारांमागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर बीएमसी प्रशासनाने बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी संचालक (अभियांत्रिकी व सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती भविष्यातील बदल्यांबाबत निर्णय घेणार आहे.

याशिवाय, बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या काही विभागांच्या धर्तीवर सॉफ्टवेअर तयार करून अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याची योजना आहे.

मात्र, आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का, आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS