वर्सोवा नाना-नानी पार्कवर कोस्टल रोड प्रकल्पाचा परिणाम; शेकडो झाडांवर संकट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 April 2026

वर्सोवा नाना-नानी पार्कवर कोस्टल रोड प्रकल्पाचा परिणाम; शेकडो झाडांवर संकट


मुंबई - वर्सोवा परिसरातील नाना-नानी पार्कवर प्रस्तावित कोस्टल रोड (उत्तर) प्रकल्पामुळे गंभीर पर्यावरणीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संबंधित स्थळाची पाहणी करून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नाना-नानी पार्कमध्ये सुमारे १३७ झाडे तोडण्याचा प्रस्ताव असून, प्रत्यक्षात याचा परिणाम अधिक व्यापक असल्याचे त्यांनी सांगितले. उद्यानात आणखी १०० पेक्षा अधिक झाडे व वनस्पती आहेत, मात्र त्यांची अधिकृत नोंद नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच प्रस्तावित पुलाच्या रचनेमुळे निर्माण होणाऱ्या सावलीमुळे उद्यानातील जवळपास २५० झाडे बाधित होऊन नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

याशिवाय, नाना-नानी पार्कपासून बांगुर नगरपर्यंत सुमारे ३४८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव असल्याचेही निदर्शनास आले. यातील अनेक झाडे ५० वर्षांहून अधिक जुनी असून ती ‘वारसा वृक्ष’ म्हणून पात्र ठरतात. महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ नुसार अशा झाडांना विशेष संरक्षण देणे बंधनकारक आहे. त्यामुळे योग्य प्रक्रियेविना झाडतोड होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रकल्पासाठी सादर करण्यात आलेल्या पर्यावरणीय परिणाम अहवालाचा (EIA) संपूर्ण आढावा घेण्यात आला आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनीही या प्रकल्पामुळे हरितक्षेत्राचे मोठे नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

या पाहणीवेळी नगरसेवक यशोधर फणसे, मिलिंद वैद्य, प्रमोद सावंत, नगरसेविका हर्षदा मोरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS