मुंबई अग्निशमन दलाच्या फ्लड रेस्क्यू ट्रेनिंगवर वाद; उन्हाळ्यात प्रशिक्षण थांबवण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 May 2026

मुंबई अग्निशमन दलाच्या फ्लड रेस्क्यू ट्रेनिंगवर वाद; उन्हाळ्यात प्रशिक्षण थांबवण्याची मागणी


मुंबई - मे महिन्यातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाकडून गिरगाव चौपाटी येथे सुरू असलेल्या ‘फ्लड रेस्क्यू ट्रेनिंग’वर आक्षेप घेण्यात आला आहे. बीएमसी एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी हे प्रशिक्षण तात्काळ स्थगित करण्याची मागणी अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.

डॉ. कांबळे-बापेरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासन आणि महापालिकेकडून नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन केले जात असताना, अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक उन्हात समुद्रकिनारी प्रशिक्षणासाठी ठेवणे धोकादायक ठरू शकते.

त्यांनी मुंबई अग्निशमन दलात सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचाही मुद्दा उपस्थित केला. वाढत्या तापमानामुळे शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असताना कर्मचारी आगीसाठी सज्ज ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, प्रशिक्षणादरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याला उष्माघाताचा त्रास झाल्यास त्याचा परिणाम मुंबईच्या अग्निसुरक्षेवर होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर सदर ‘फ्लड रेस्क्यू ट्रेनिंग’ पावसाळा किंवा हिवाळ्यात आयोजित करावे आणि सध्या सुरू असलेले प्रशिक्षण तातडीने थांबवावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS