नालेसफाईसाठी आवश्यक ठिकाणी रोबोटिक यंत्रणेचा वापर करा - महापौर रितू तावडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2026

नालेसफाईसाठी आवश्यक ठिकाणी रोबोटिक यंत्रणेचा वापर करा - महापौर रितू तावडे


मुंबई - पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरातील सर्व नालेसफाईची कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करावीत तसेच आवश्यक ठिकाणी रोबोटिक यंत्रणेचा वापर करून भूमिगत नाले व मोऱ्यांची स्वच्छता करावी, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले.

महापौर तावडे यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्यासह पूर्व उपनगरांतील विविध ठिकाणी सुरू असलेल्या नालेसफाई व रस्ते विकास कामांची आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नालेसफाई कामांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना कामांचे निरीक्षण करता यावे यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही सांगितले.

भांडुप (पूर्व) येथील उषानगर नाला, मुलुंड (पूर्व) येथील गव्हाणपाडा बाऊंड्री नाला, घाटकोपर येथील सोमय्या नाला तसेच कुर्ला (पश्चिम) येथील साकीनाका मेट्रो स्थानकाखालील नाला क्रमांक १० या ठिकाणच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. गाळ उपशाची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री वापरण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सफेद पूल परिसरातील नाल्यांची आधुनिक यंत्रसामग्रीने स्वच्छता करावी तसेच गाळासह नाल्यांतील तरंगत्या वस्तू व टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नालेसफाईसोबतच महापौर तावडे यांनी मुलुंड व टी विभागातील रस्ते काँक्रिटीकरण कामांची पाहणी केली. रस्त्यांची गुणवत्ता, पदपथ, पाणी निचरा व्यवस्था आणि उपयोगिता वाहिन्यांबाबत दक्षता घेऊन ही कामेही ३१ मेपर्यंत पूर्ण करून वाहतुकीस खुली करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

दरम्यान, मुलुंड (पूर्व) येथे प्रकल्पबाधितांसाठी उभारण्यात येत असलेल्या ७,५०० सदनिकांच्या गृहप्रकल्पालाही त्यांनी भेट देऊन पुनर्वसनाचे काम कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS