SIR प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप; मशिदींतील बैठकींबाबत मंत्री लोढा यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2026

SIR प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप; मशिदींतील बैठकींबाबत मंत्री लोढा यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार


मुंबई, २५ जून : विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान मालबार हिल मतदारसंघात कथित अनियमितता होत असल्याचा आरोप करत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मालबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. बीएलओंकडून मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी बैठका घेतल्या जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

विल्सन महाविद्यालय येथे मुख्य निवडणूक अधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांची भेट घेऊन मंत्री लोढा यांनी यासंदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले. अशा बैठकींद्वारे मतदार नोंदणी प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब गंभीर असून त्याची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी मंत्री लोढा यांनी काही व्यक्तींकडून दुहेरी मतदार नोंदणीचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला. विविध राज्यांमध्ये एकाच व्यक्तीची मतदार म्हणून नोंद असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत त्यांनी अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज व्यक्त केली.

दरम्यान, मालबार हिलमधील नागरिकांच्या वतीने SIR प्रक्रियेसंदर्भातील काही महत्त्वाच्या मागण्याही त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. पुनर्विकास, एसआरए प्रकल्प किंवा धोकादायक इमारतींमुळे तात्पुरत्या स्वरूपात अन्यत्र वास्तव्यास गेलेल्या नागरिकांची मतदार नोंदणी त्यांच्या मूळ पत्त्यावरच कायम ठेवण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. अन्यथा भविष्यात पुन्हा पत्ता बदलण्यासाठी अतिरिक्त प्रक्रिया करावी लागेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, तात्पुरत्या स्थलांतरित नागरिकांसाठी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करणे, सूचना त्यांच्या सध्याच्या पत्त्यावर पाठविणे आणि मतदार पडताळणीसाठी नियुक्त बीएलओ व बीएलए यांना आवश्यक अधिकृत कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

मतदार पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध पद्धतीने राबवली जावी तसेच कोणत्याही पात्र मतदारावर अन्याय होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS