महाराष्ट्रात कौशल्य शिक्षणाला मोठी चालना; IES कौशल्य विद्यापीठाला मंजुरी, ₹7,000 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2026

महाराष्ट्रात कौशल्य शिक्षणाला मोठी चालना; IES कौशल्य विद्यापीठाला मंजुरी, ₹7,000 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा


मुंबई, २४ जून : महाराष्ट्रातील तरुणांना जागतिक रोजगार बाजारपेठेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने कौशल्याधारित शिक्षण क्षेत्रात मोठी पावले उचलली आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे (स्थापना व विनियमन) दुसरी सुधारणा विधेयक २०२६ मांडत मुंबईतील इंडियन एज्युकेशन सोसायटी (IES) ला खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली. याचबरोबर राज्यातील आयटीआय संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे ₹7,000 कोटींच्या विविध प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.

१०८ वर्षांचा शैक्षणिक वारसा असलेल्या IES संस्थेला जागतिक दर्जाचे कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याची मान्यता देण्यात आली आहे. या विद्यापीठात डिजिटल मार्केटिंग, फिनटेक, ड्रोन टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स ॲनालिटिक्स, वास्तुकला आणि पब्लिक पॉलिसी यांसारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

राज्यातील आयटीआय संस्थांचा कायापालट करण्यासाठी जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ₹4,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहन (EV), सोलर ऊर्जा आणि ड्रोन तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील प्रशिक्षणावर विशेष भर दिला जाणार आहे.

तसेच, टाटा समूह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन आयटीआय संस्थांना दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी सुमारे ₹3,000 कोटींचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.

राज्यातील युवकांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्याविहार येथे कार्यरत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात असून, एक लाख आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

खाजगी कौशल्य विद्यापीठांचे व्यावसायिकरण रोखण्यासाठी सरकारने कडक नियम लागू केले आहेत. प्रत्येक विद्यापीठासाठी ₹10 कोटींची बँक गॅरंटी, शासकीय प्रतिनिधींचा सहभाग आणि सामाजिक आरक्षणाच्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, बदलत्या जागतिक गरजांनुसार आयटीआय अभ्यासक्रमांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. जुन्या अभ्यासक्रमांच्या जागी आधुनिक आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू करून तरुणांना रोजगारक्षम बनविण्यावर भर दिला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages