महापौरांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान बीएमसी कर्मचारी गटारात पडला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2026

महापौरांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान बीएमसी कर्मचारी गटारात पडला


मुंबई, २४ जून : मुसळधार पावसानंतर जलमय झालेल्या किंग्ज सर्कल परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या दौऱ्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. गांधी मार्केट परिसरात पाहणी सुरू असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेचा एक कर्मचारी गटारात पडला. सुदैवाने उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

मुंबईत मंगळवार रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. बुधवारी मध्यरात्री पडलेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले. मुंबईत पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे यांचा दौरा सुरू होता. या दौऱ्यादरम्यान महापालिकेच्या एफ-उत्तर विभागातील मुकादम म्हणून कार्यरत असलेला कर्मचारी पाण्याचा निचरा आणि परिस्थितीची पाहणी करत असताना तोल जाऊन गटारात पडला. या घटनेत त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “हा कर्मचारी अपघाताने पडलेला नाही, तर तो प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या आणि भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात पडला आहे. ही घटना म्हणजे भ्रष्टाचाराचे उघड झालेले वास्तव आहे,” असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, महापौर कार्यालयाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत कर्मचाऱ्याला तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे स्पष्ट केले.

किंग्ज सर्कलमधील गांधी मार्केट परिसर हा दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचणारा सखल भाग म्हणून ओळखला जातो. या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने २०२२ मध्ये सुमारे १९ कोटी रुपये खर्चून भूमिगत मिनी पंपिंग स्टेशन उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. यंदाच्या मान्सूनमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अतिरिक्त पावसाचे पाणी भूमिगत कक्षामध्ये जमा करून ते पंपद्वारे भारतनगर नाल्यात सोडण्याची व्यवस्था या प्रकल्पात करण्यात आली आहे.

मात्र, मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा या भागात जलभराव झाल्याने पूरनियंत्रण उपाययोजनांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages