महापालिकेची यंत्रणा सज्ज; सखल भागांतील पाण्याचा वेगाने निचरा, ७ हजार कर्मचारी तैनात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2026

महापालिकेची यंत्रणा सज्ज; सखल भागांतील पाण्याचा वेगाने निचरा, ७ हजार कर्मचारी तैनात




मुंबई, २४ जून : मुंबईत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि उपनगरांतील अनेक भागांत जलभरावाची परिस्थिती निर्माण झाली असली तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. सखल भागांमध्ये साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी डिवॉटरिंग पंप, पर्जन्यजल उपसा केंद्रे आणि पूरनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून ७ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कुलाबा येथे २४८ मिमी तर सांताक्रूझ येथे २२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. स्थानिक स्तरावरील नोंदीनुसार मालवणी परिसरात तब्बल ३४० मिमी तर परळ परिसरात ३३४ मिमी पाऊस झाला आहे.

सततच्या पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचले असले तरी महापालिकेच्या आपत्कालीन पथकांनी तातडीने उपाययोजना करून पाण्याचा निचरा सुरू केला. शहरातील महत्त्वाचे रस्ते, पूल, रेल्वे स्थानके आणि किनारी भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, अभियांत्रिकी विभाग आणि इतर संबंधित यंत्रणा २४ तास कार्यरत असून नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद दिला जात आहे. नालेसफाई, पर्जन्यजल वाहिन्यांची पाहणी आणि जलनिचरा व्यवस्थेचे निरीक्षण सातत्याने सुरू आहे.

दरम्यान, झाडे पडणे, शॉर्टसर्किट, जलभराव आणि इतर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages