बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अंतरिम पगार वाढीची घोषणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2026

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अंतरिम पगार वाढीची घोषणा


मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावर अखेर तोडगा निघाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर कृती समितीने संप मागे घेत असल्याची घोषणा केली. कर्मचाऱ्यांना नवीन वेतन करार होईपर्यंत अंतरिम दिलासा म्हणून दरमहा ३,००० रुपयांची तर वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २,००० रुपयांची हंगामी वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, आमदार मुरजी पटेल, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम चालू आर्थिक वर्षातच अदा करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच बेस्टची आर्थिक आणि सेवा क्षमता वाढवण्यासाठी पुढील तीन वर्षांत ५,००० नवीन बसेस स्वतःच्या मालकीच्या घेण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बेस्ट बससेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश देत, बेस्ट ही मुंबईकरांची ‘लाईफलाईन’ असून तिचे सक्षमीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. बेस्ट प्रशासनाने तयार केलेला ‘कायापालट’ प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करून त्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळवून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

दरम्यान, शासनाच्या आश्वासनांनंतर कृती समितीने संप मागे घेण्याची घोषणा केल्याने लाखो मुंबईकरांना दिलासा मिळाला असून बेस्टची बससेवा पुन्हा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages