मुंबईची लाइफलाइन ठप्प; बेस्ट संपामुळे लाखो प्रवाशांचे हाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2026

मुंबईची लाइफलाइन ठप्प; बेस्ट संपामुळे लाखो प्रवाशांचे हाल


मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा रविवारीही मोठा परिणाम पाहायला मिळाला. बेस्टच्या नियोजित १७९ पैकी एकही बस रस्त्यावर उतरली नसल्याने मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडली. लाखो प्रवाशांचे हाल होत असताना रेल्वे आणि अन्य वाहतूक सेवांवर प्रचंड ताण निर्माण झाला.

बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ४ वाजेपर्यंत बेस्टच्या नियोजित १७९ पैकी एकही बस रस्त्यावर उतरली नाही. 'वेट-लीज' तत्त्वावरील २,०३३ बसेसपैकीही एकही बस सेवेत दाखल झाली नाही. संपाला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. बेस्टच्या २,५४४ चालकांपैकी केवळ ३३ चालक आणि ३,७६० वाहकांपैकी अवघे ६ वाहक कामावर हजर होते. वेट-लीज विभागातील स्थिती आणखी गंभीर होती. तेथील ४,०५२ चालकांपैकी फक्त १३ चालक कामावर आले, तर एकही वाहक हजर नव्हता.

संपामुळे शहरातील बससेवा जवळपास पूर्णपणे ठप्प झाली असून, कामगार संघटनांनी आपल्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका कायम ठेवली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी तातडीने अदा करणे, रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करणे आणि वेट-लीज बसवरील अवलंबित्व कमी करणे यांचा समावेश आहे.

दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपाला 'बेकायदेशीर' ठरवत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. कामगार प्रतिनिधींसोबत चर्चा सुरू असून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संपामुळे मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी बेस्ट सेवा ठप्प झाल्याने लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून, आता सरकार आणि कामगार संघटनांमधील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS