मुंबईला ऑरेंज अलर्ट; पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2026

मुंबईला ऑरेंज अलर्ट; पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई - मुंबईत पावसाने पुन्हा हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी सकाळी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांत शहरातील काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सकाळी ७ वाजता जारी करण्यात आलेला हा इशारा पुढील तीन तासांसाठी लागू राहणार आहे.

दरम्यान, सकाळी ६ ते ७ या एका तासात मुंबई शहर विभागात सरासरी १७ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात पावसाची नोंद झाली नसली तरी पश्चिम उपनगरात सरासरी १० मिमी पाऊस पडला.

या कालावधीत सर्वाधिक पाऊस वरळी आणि वांद्रे परिसरात नोंदविण्यात आला. वरळी नाका येथील सावित्रीबाई फुले महापालिका शाळा परिसरात तब्बल ६१ मिमी पाऊस झाला. जी/दक्षिण विभागात ५८ मिमी, आदर्श नगर शाळा (वरळी) येथे ४४ मिमी, मालबार हिल येथे ४४ मिमी, वरळी सी-फेस येथे ३७ मिमी तर डी वॉर्ड कार्यालय परिसरात ३० मिमी पावसाची नोंद झाली.

पश्चिम उपनगरात वांद्रे येथील पाली-चिंबई शाळा आणि सुपारी टँक महापालिका शाळा परिसरात प्रत्येकी ७० मिमी पाऊस कोसळला. तसेच एच/पश्चिम वॉर्ड कार्यालय परिसरात ३० मिमी, वांद्रे अग्निशमन केंद्रात २८ मिमी तर जुहू परिसरात २५ मिमी पावसाची नोंद झाली.

जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages