मुसळधार पावसाचा मुंबई लोकलवर परिणाम; सर्व मार्गांवरील गाड्या उशिराने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2026

मुसळधार पावसाचा मुंबई लोकलवर परिणाम; सर्व मार्गांवरील गाड्या उशिराने


मुंबई, २४ जून : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर झाला असून मध्य, हार्बर, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. मात्र, कोणत्याही मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प नसून सर्व सेवा सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या सध्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. पावसामुळे रुळांवरील सुरक्षिततेच्या दृष्टीने गाड्यांचा वेग कमी करण्यात आल्याने हा विलंब होत असून कुठेही तांत्रिक अडथळा नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हार्बर मार्गावरील वाहतूकही १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. या मार्गावरही पावसामुळे वेग मर्यादा लागू करण्यात आल्याने गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा तुलनेने सुरळीत असून गाड्या सुमारे १० मिनिटे उशिराने धावत आहेत.

दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे-कोपरखैरणे दरम्यान रुळाखालची जमीन खचल्याने निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात आला आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या विभागात वेग मर्यादा लागू करण्यात आल्याने ठाणे-वाशी-नेरुळ-पनवेल दरम्यानच्या लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. तरीही या मार्गावरील सर्व लोकल सेवा सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मुसळधार पावसामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय होत असली तरी सर्व मार्गांवर रेल्वे सेवा सुरू असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages