मुंबईला पावसाने झोडपले; पश्चिम उपनगरात २०८ मिमी पावसाची नोंद, रेल्वे वाहतुकीवर परिणाम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2026

मुंबईला पावसाने झोडपले; पश्चिम उपनगरात २०८ मिमी पावसाची नोंद, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

फाईल फोटो

मुंबई - मुंबईत गेल्या २४ तासांपासून (२३ ते २४ जून २०२६) सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. शहर आणि उपनगरांमध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला आहे. अंधेरी सबवे, किंग सर्कल, दादर हिंदू कॉलनीसह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार २३ जून सकाळी ८ ते २४ जून सकाळी ८ या २४ तासांत पश्चिम उपनगरात सर्वाधिक २०८ मिमी, शहर भागात १९५ मिमी तर पूर्व उपनगरात १६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतुकीचा वेग मंदावला.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे आणि कोपरखैरणे स्थानकांदरम्यान रुळाखालची दगड-रेती वाहून गेल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.

हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांसाठी आजही मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सकाळी ८.२८ वाजता ३.४१ मीटर आणि सायंकाळी ७.४१ वाजता ३.३५ मीटर उंच भरतीची नोंद होणार असल्याने नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि रेल्वे प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages