पावसाळ्यात मुंबईतील वाहतूक व्यवस्थेसाठी प्रभावी उपाययोजना करा – प्रभाकर शिंदे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2026

पावसाळ्यात मुंबईतील वाहतूक व्यवस्थेसाठी प्रभावी उपाययोजना करा – प्रभाकर शिंदे


मुंबई - पावसाळ्यात मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई महानगरात दररोज लाखो नागरिक रोजगार, शिक्षण आणि विविध कामांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. मात्र, मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे तसेच रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो, असे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

मोठ्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी तुंबल्यास वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यापूर्वी संबंधित ठिकाणी आवश्यक सुविधा, वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि पर्यायी उपाय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पावसाळ्यात रेल्वे सेवा सुरळीत राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय राखण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर होण्यासाठी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच या विषयावर गटनेत्यांसमोर चर्चा घडवून आणावी, अशी विनंतीही प्रभाकर शिंदे यांनी महापौरांना केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS