मुंबईत ३० दिवस ड्रोनबंदी; पोलीस आयुक्तांचा आदेश लागू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 June 2026

मुंबईत ३० दिवस ड्रोनबंदी; पोलीस आयुक्तांचा आदेश लागू


मुंबई - मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने बृहन्मुंबई पोलिसांनी ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हँड ग्लायडर्स, हॉट एअर बलून आदी उड्डाण साधनांवर तात्पुरती बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.

पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.

आदेशानुसार, दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी घटक ड्रोन आणि तत्सम उड्डाण साधनांचा वापर करून व्हीआयपी व्यक्ती, महत्त्वाच्या सरकारी इमारती किंवा सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे सार्वजनिक जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

या आदेशानुसार १२ जून २०२६ ते ११ जुलै २०२६ या कालावधीत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हँड ग्लायडर्स, हॉट एअर बलून आदींच्या उड्डाणास बंदी राहणार आहे. मात्र, पोलीस उपआयुक्त (अभियान) यांच्या विशेष लेखी परवानगीने काही बाबींना अपवाद राहील.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अलीकडेच मुंबईतील महत्त्वाच्या कार्यालयांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. नागरिकांनी कोणतेही ड्रोन किंवा तत्सम उड्डाण साधन उडवण्यापूर्वी आवश्यक परवानगी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

मुंबई पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि संशयास्पद हालचालींची त्वरित माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS