महापौर रितू तावडे यांच्या हस्ते नोंदणीकृत फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्रांचे वितरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2026

महापौर रितू तावडे यांच्या हस्ते नोंदणीकृत फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्रांचे वितरण


मुंबई, २५ जून : मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांना अधिकृत ओळख मिळावी आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने QR कोड आधारित ओळखपत्र वितरणास सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा प्रातिनिधिक शुभारंभ गुरुवारी महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात झाला.

नगर पथविक्रेता (फेरीवाला) अधिनियम आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील ९९,४३५ नोंदणीकृत फेरीवाल्यांना QR कोड आधारित ओळखपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. शुभारंभ कार्यक्रमात शहरातील विविध भागांतील सुमारे १०० नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्रे देण्यात आली.

यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या की, फेरीवाल्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पदभार स्वीकारल्यानंतर या विषयाचा सखोल आढावा घेऊन अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीनंतर नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आणि त्यानंतर ही प्रक्रिया मार्गी लागली.

महापौरांनी सांगितले की, पात्र फेरीवाल्यांना अधिकृत ओळख मिळावी, तर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सुलभ व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. कोणत्याही पात्र फेरीवाल्यावर अन्याय होणार नाही आणि लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी महानगरपालिका पुढेही प्रयत्नशील राहील.

या कार्यक्रमाला सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, विविध पक्षांचे गटनेते, समिती अध्यक्ष, नगरसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages