
मुंबई | जेपीएन न्यूज - सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथील विश्वकर्मा रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी BESTच्या 501 क्रमांकाच्या बसचा भीषण अपघात झाला. बसने रस्त्यावरील दुभाजकाला (रोड डिव्हायडर) जोरदार धडक दिल्याने एक पादचारी जागीच ठार झाला, तर बसचा चालक आणि वाहक जखमी झाले.
ही घटना सकाळी सुमारे 9.14 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात तीन जण जखमी झाले होते. त्यापैकी एका व्यक्तीला रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले, तर दोन जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अपघातातील मृत व्यक्तीचे नाव भास्कर रावसाहेब पांडे (वय 65) असून ते रस्त्यालगतच्या दुभाजकाजवळ उभे होते. धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये वैभव वाघमारे (वय 41), बस वाहक, आणि बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (वय 51), बस चालक, यांचा समावेश असून दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मानखुर्द पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे. अपघातामुळे काही काळ सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
बातमी अपडेट होतेय...


No comments:
Post a Comment