
नवी दिल्ली । जेपीएन न्यूज - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत झालेल्या 'चलो संसद' आंदोलनामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. शिक्षण क्षेत्रातील कथित परीक्षा पेपरफुटी, युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो आंदोलक संसदेकडे कूच करू लागल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवले.
जंतर-मंतर परिसरातून संसदेकडे निघालेल्या मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स उभारले होते. आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या तसेच लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
या आंदोलनामागे युवकांच्या नेतृत्वाखालील Cockroach Janta Party (CJP) ही चळवळ असून, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. शिक्षण सुधारणा आणि युवकांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसर, जंतर-मंतर आणि मध्य दिल्लीतील संवेदनशील भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहतूक वळविण्यात आली. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.
आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असली तरी आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका कायम ठेवत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


No comments:
Post a Comment