'युट्यूब चॅनेल चालवणे म्हणजे पत्रकारिता नव्हे'; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2026

'युट्यूब चॅनेल चालवणे म्हणजे पत्रकारिता नव्हे'; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण


नागपूर | जेपीएन न्यूज - मोबाईल फोन, मायक्रोफोन आणि युट्यूब चॅनेलच्या आधारे स्वतःला पत्रकार किंवा 'युट्यूब रिपोर्टर' म्हणवून घेणे म्हणजे पत्रकारिता होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. माध्यम स्वातंत्र्याचा गैरवापर रोखण्यासाठी पत्रकारितेत उत्तरदायित्व आणि नैतिक मूल्यांचे पालन आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती प्रशांत जोशी यांच्या खंडपीठाने जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदविले. न्यायालयाने म्हटले की, माध्यम स्वातंत्र्य हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असला तरी त्याचा वापर कायदा, जबाबदारी आणि नैतिकतेच्या चौकटीतच झाला पाहिजे.

न्यायालयाने यावरही भर दिला की, पत्रकारितेच्या नावाखाली धमकी देणे, खंडणी उकळणे किंवा कोणावर वैयक्तिक दबाव टाकणे अशा प्रकारांना कोणतेही कायदेशीर संरक्षण मिळू शकत नाही. डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पत्रकारितेच्या नावाने होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी नियामक यंत्रणेची आवश्यकता असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

उच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या व्यक्तींच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, माध्यम स्वातंत्र्य आणि त्याच्या गैरवापरातील सीमारेषा अधिक स्पष्ट करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS