
मुंबई | JPN NEWS
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या माध्यमातून काही मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पारदर्शक पद्धतीने SIR प्रक्रिया राबवावी आणि एकाही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, याची खात्री करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राजहंस म्हणाले की, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांबाबत निर्माण झालेल्या वादानंतर आता मुंबईतही काही मतदारांची नावे वगळण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे दिसत आहे. विशेषतः पुनर्विकासासाठी पाडलेल्या इमारती तसेच एसआरए प्रकल्पांतील नागरिकांचे मॅपिंग करण्यात आले असतानाही त्यांची नावे वगळण्याची मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुनर्विकासामुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळल्यास त्याचा चुकीचा पायंडा पडेल आणि भविष्यात मुंबईतील अनेक भागांतील नागरिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई काँग्रेसने SIR प्रक्रियेबाबत वेळोवेळी निवडणूक आयोगाला पत्रे पाठवून तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन सूचना आणि मागण्या मांडल्या असल्याचे सांगत, निवडणूक आयोगाने स्वतंत्र आणि स्वायत्त संस्थेप्रमाणे काम करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये, असे आवाहन राजहंस यांनी केले.
संविधानाने प्रत्येक १८ वर्षांवरील भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला असून, कोणत्याही पात्र मतदाराचा हा अधिकार हिरावला जाऊ नये. SIR प्रक्रियेदरम्यान एकाही नागरिकाचे नाव अन्यायकारकपणे वगळले जाणार नाही, याची निवडणूक आयोगाने खबरदारी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.


No comments:
Post a Comment