निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी BMC MARDचे महापौरांना साकडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी BMC MARDचे महापौरांना साकडे

Share This

मुंबई | JPN NEWS - 
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत BMC MARD 2026–27 च्या शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या रजा धोरण, मानधन, शैक्षणिक शुल्क, वसतिगृह सुविधा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

डॉ. ऋतुजा राऊत (अध्यक्ष, BMC MARD) आणि डॉ. पूजा अग्रवाल (सदस्य) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विद्यमान बॅचमधील निवासी डॉक्टरांच्या रजा धोरणात मध्यावधीत करण्यात आलेल्या बदलांमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करून त्यांच्या विद्यमान रजा हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली.

याशिवाय सेवांतर्गत पदव्युत्तर (In-service PG) डॉक्टरांना शैक्षणिक शुल्कातून सूट, महागाई भत्ता (DA) वाढीची स्वयंचलित अंमलबजावणी, निवासी डॉक्टरांचे मानधन वेळेत जमा करणे, वसतिगृहातील पायाभूत सुविधा, सुरक्षित पिण्याचे पाणी, पुरेशी निवास व्यवस्था आणि चोवीस तास पौष्टिक व दर्जेदार भोजन उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

महापौर रितू तावडे यांनी निवासी डॉक्टरांच्या समस्या संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमोर प्राधान्याने मांडण्याचे आश्वासन दिले. तसेच बैठकीत चर्चिलेल्या सर्व मागण्यांचा समावेश असलेले अधिकृत पत्र महापौर कार्यालयाकडून जारी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल BMC MARD ने महापौरांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages