मुंबईची वाताहत भाजपामुळेच; वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईची वाताहत भाजपामुळेच; वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल

Share This

मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. ५ जुलै :
मुंबईतील मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये पाण्यात जात असून, शहराची वाताहत होण्यास भाजपच जबाबदार आहे. विकासाच्या नावाखाली भाजपाने मुंबई बकाल केली आहे, असा घणाघात त्यांनी केला.

गायकवाड म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिकेत गेली ३० वर्षे भाजपाचीच सत्ता आहे. त्यापैकी २५ वर्षे शिवसेनेसोबत युतीत आणि त्यानंतर प्रशासकांच्या माध्यमातूनही भाजपाच कारभार पाहत आहे. त्यामुळे मुंबईच्या दुर्दशेची जबाबदारी झटकण्याचा भाजपाचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यांनी आरोप केला की, नालेसफाईसाठी दरवर्षी १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करूनही मुंबई पहिल्याच पावसात जलमय होते. झाडे कोसळणे, रस्ते खचणे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरणे आणि वाहतूक कोंडी अशा समस्या कायम आहेत. मात्र महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी नेते १०० टक्के कामे झाल्याचे दावे करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

महापौर आणि पालिका प्रशासनावर टीका करताना त्या म्हणाल्या, महापौर रील्स बनवण्यात व्यस्त आहेत, तर आयुक्तांकडूनही कोणतेही उल्लेखनीय काम झालेले नाही. गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्घटनांकडे भाजप गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप नेत्यांच्या "रस्त्यावर उतरून काम करतो" या दाव्यावरही त्यांनी निशाणा साधला. दिल्लीपासून मुंबईपर्यंत भाजपाची सत्ता असताना कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईकरांना मूलभूत सुविधा का मिळत नाहीत? प्रत्येक यशाचे श्रेय घ्यायचे, पण अपयशाची जबाबदारी स्वीकारायची नाही, ही भाजपाची भूमिका आहे, असे त्या म्हणाल्या.

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरही सवाल -
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ७,१८० कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्पावरही गायकवाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत रस्त्यावर खड्डे पडल्याचा उल्लेख करत, "प्रवाशांच्या जीवाशी खेळून कसली टेस्टिंग करता?" असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या महामार्गावर इतक्या कमी कालावधीत खड्डे पडत असतील, तर त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी सरकार स्पष्टीकरण देत असल्याची टीका त्यांनी केली. मुंबई सुरक्षित आणि सक्षम करायची असेल तर भाजपाने जबाबदारी स्वीकारून काम करावे, अन्यथा खुर्ची खाली करावी, असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages