Mumbai Rain - मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai Rain - मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

Share This

मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. ५ जुलै :
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर रविवारीही कायम असून, पुढील २४ तास शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, ५५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै सकाळी ८ ते ५ जुलै सकाळी ८ या २४ तासांत शहरात १९४ मिमी, पूर्व उपनगरात २१७ मिमी आणि पश्चिम उपनगरात १८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, IMD च्या आकडेवारीनुसार विक्रोळी येथे सर्वाधिक २५३ मिमी, राम मंदिर परिसरात २५२.५ मिमी, सांताक्रूझमध्ये २२४.५ मिमी, भायखळा १७२.५ मिमी, विद्याविहार १६९ मिमी, कुलाबा १६५.५ मिमी, सायन १५७.५ मिमी आणि टाटा पॉवर, चेंबूर येथे १३६ मिमी पावसाची नोंद झाली.

आज दुपारी ३.२२ वाजता ४.१९ मीटरची भरती, तर उद्या (६ जुलै) पहाटे ३.४१ वाजता ३.५१ मीटरची भरती अपेक्षित आहे. तसेच आज रात्री ९.३१ वाजता ओहोटी होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये संततधार पाऊस सुरू असला तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष कार्यस्थळी सज्ज असून नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहे. रेल्वे, बेस्ट आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत सुरू असून मुंबईतील जनजीवनही नियमित सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

आज दुपारी ३.२२ वाजता समुद्राला ४.१९ मीटर उंचीची भरती येणार असल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर झाडाखाली थांबू नये किंवा वाहने पार्क करू नयेत, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे, हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages