अंधेरीत BEST बसचा भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने १४ वाहनांना धडक, दोघे जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2026

अंधेरीत BEST बसचा भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने १४ वाहनांना धडक, दोघे जखमी


मुंबई | जेपीएन न्यूज - अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोड परिसरात शुक्रवारी दुपारी बेस्टच्या बसचा भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या बसने चार कार, नऊ रिक्षा आणि एका टेम्पोसह एकूण १४ वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्ग क्रमांक २४२ वरील बेस्टची बस मिल्लत नगर ते अंधेरी बस स्थानक दरम्यान धावत होती. दुपारी सुमारे ४.१५ वाजता सीझर रोडवरून एस. व्ही. रोडकडे वळत असताना बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अपघातानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि बेस्टचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. जखमींना तातडीने कूपर रुग्णालय तसेच इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या अपघातात संतलाल यादव (३३) आणि साक्षी (३३) हे दोघे किरकोळ जखमी झाले असून दोघांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बसचालक आणि वाहक यांना चौकशीसाठी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि बेस्ट प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS