
मुंबई | जेपीएन न्यूज - मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया येथे जाणाऱ्या ८०० लाभार्थ्यांना घेऊन विशेष तीर्थदर्शन रेल्वेला सोमवारी दादर रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्येक लाभार्थ्याला सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुखकर यात्रा देण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही केवळ तीर्थयात्रा नसून ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण करणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. बोधगया येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंना भविष्यात कायमस्वरूपी आणि दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे १० एकर जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असून शासन त्याबाबत सकारात्मक प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमुळे आर्थिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे तीर्थयात्रेला जाऊ न शकलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना बोधगयाचे दर्शन घेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेदरम्यान प्रत्येक लाभार्थ्यास आरक्षित आसन, दर्जेदार भोजन, नाश्ता, निवास, वैद्यकीय सुविधा आणि अधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या विशेष तीर्थयात्रेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील ८०० पात्र लाभार्थी सहभागी झाले असून, २० ते २६ जुलै २०२६ या कालावधीत ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. प्रवास, भोजन, निवास, वैद्यकीय सेवा आणि इतर सर्व आवश्यक सुविधा शासनामार्फत लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला आमदार कालिदास कोळंबकर, आमदार मनीषा कायंदे, आमदार तुकाराम काते, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


No comments:
Post a Comment