
मुंबई / JPN NEWS -
अमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित सामूहिक लढा आहे. त्यामुळे ‘ड्रग फ्री मुंबई’, ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग फ्री भारत’ घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वरळी डोम येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना अमली पदार्थमुक्त समाजाची शपथ दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारत विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. मात्र, देशाच्या युवा शक्तीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवून भारताला आतून कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ड्रग्स हे या छुप्या युद्धातील धोकादायक शस्त्र असून, त्याविरोधातील लढा प्रत्येक नागरिकाने स्वतःचा लढा समजून लढला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शाळा-कॉलेज परिसरातील ड्रग्सविरोधात कठोर कारवाई -
अमली पदार्थांची निर्मिती, तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात ड्रग्स विक्री करणाऱ्या टोळ्यांचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विद्यार्थ्यांनी ‘ड्रग्सला नाही’ असा ठाम निर्धार केल्यास त्यांना व्यसनाच्या आहारी नेणे कोणालाही शक्य होणार नाही. पुढील दोन ते चार वर्षांत ‘ड्रग फ्री मुंबई’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ड्रग्सच्या व्यवहाराबाबत माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असून, उपयुक्त माहिती देणाऱ्यांना पुरस्कारही दिले जाणार आहेत.
४ हजारांहून अधिक समित्या, १ हजार प्रशिक्षित समुपदेशक -
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘ड्रग फ्री स्कूल’ आणि ‘ड्रग फ्री कॅम्पस’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा-महाविद्यालयांमध्ये चार हजारांहून अधिक मार्गदर्शन व समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या असून, एक हजारांपेक्षा अधिक प्रशिक्षित समुपदेशकांचे जाळे उभारण्यात आले आहे.
व्यसनाधीन युवकांचे पुनर्वसन करून त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावरही शासनाचा भर राहणार आहे. युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता व्यसनांना ठाम नकार द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
‘ड्रग फ्री मुंबई’ लोकचळवळ बनवूया – मंगलप्रभात लोढा
‘ड्रग फ्री मुंबई’ हे केवळ शासनाचे अभियान नसून समाजाच्या सक्रिय सहभागातून उभी राहणारी व्यापक लोकचळवळ आहे, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मुंबई पूर्णपणे अमली पदार्थमुक्त होईपर्यंत ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती, समुपदेशन आणि व्यसन प्रतिबंधक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
दरम्यान, येत्या १५ ऑगस्टपासून ‘सीएम महाधन’ कौशल्य विकास योजना सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात एक लाख युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य दिले जाणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली.
पाच लाखांहून अधिक विद्यार्थी, पालक ऑनलाइन सहभागी -
‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी मुंबईतील चार हजारांहून अधिक शाळा-महाविद्यालयांतील पाच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, पालक आणि नागरिक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ऑनलाइन संवादात सहभागी झाले.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘नशामुक्त मुंबई’ अभियानासाठी पाठविलेला संदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वाचून दाखविला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘Training Manual for Counsellors’ या प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
‘नशामुक्त मुंबई’चा संकल्प आता केवळ घोषणेत न राहता प्रत्यक्ष लोकचळवळीत रूपांतरित करण्याचे आव्हान शासनासमोर आहे. युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस कारवाईसोबतच जनजागृती, समुपदेशन आणि पुनर्वसन या तिन्ही आघाड्यांवर निर्णायक लढा देण्याचा सरकारचा निर्धार आहे.


No comments:
Post a Comment