
मुंबई / JPN NEWS -
चेंबूर येथील डायमंड उद्यानाजवळ शाळकरी बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेची आता त्रयस्थ आणि तज्ज्ञ व्यक्तीमार्फत फेरचौकशी करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ तथा माजी कुलगुरू प्रा. डॉ. संजय व्ही. देशमुख यांची एकसदस्यीय चौकशी समिती म्हणून नियुक्ती केली आहे. समितीला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
३० जून २०२६ रोजी चेंबूरमधील डायमंड उद्यानाजवळ पिंपळाचे जुने व मोठे झाड शाळकरी बसवर कोसळले होते. या दुर्घटनेत विहान श्रीवास्तव (वय ११ वर्षे) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतर महानगरपालिका प्रशासनाने प्राथमिक चौकशी समिती स्थापन केली होती.
मात्र, या समितीने सादर केलेला अहवाल महापौर रितू तावडे आणि महानगरपालिका महासभेने अमान्य केला. दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अहवालात सखोल तपास, कठोर कारवाई आणि दंडात्मक शिफारशींचा पुरेसा अभाव असल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर त्रयस्थ तज्ज्ञाची नियुक्ती करून फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.
अनेक अंगांनी होणार तपासणी -
फेरचौकशी समिती प्राथमिक चौकशीची कार्यपद्धती, उपलब्ध पुरावे आणि अहवालातील निरीक्षणांचे स्वतंत्रपणे परीक्षण करणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, जलनिःसारण, मलनिःसारण, रस्ता बांधणी, हवामान, मृदाशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासन या विविध अंगांनी दुर्घटनेचे चिकित्सक मूल्यमापन केले जाणार आहे.
घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, तिच्या मूळ कारणांचा स्वतंत्र शोध, प्राथमिक समितीने सुचविलेल्या अंतरिम उपाययोजनांचे मूल्यांकन आणि अहवालातील शिफारशींचे समीक्षात्मक परीक्षणही करण्यात येणार आहे.
याशिवाय भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक धोरणात्मक सुधारणा आणि उपाययोजनांच्याही शिफारशी समिती करणार आहे.
तज्ज्ञ डॉ. संजय देशमुखांकडे चौकशीची जबाबदारी -
प्रा. डॉ. संजय व्ही. देशमुख हे वनस्पतीशास्त्र क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्यांनी कांदळवनांबाबत भरीव कार्य केले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम केले आहे. सध्या ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (मुंबई) येथे अधिवक्ता प्राध्यापक तसेच एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असल्याचे पालिकेने सांगितले.
समितीला चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे, स्थळ पाहणीच्या वेळी संबंधित अधिकारी उपस्थित ठेवणे आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करणे, असे निर्देश पालिका प्रशासनाने संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत.
चेंबूर दुर्घटनेतील निष्काळजीपणा नेमका कुठे झाला, झाडाच्या धोकादायक स्थितीची पूर्वकल्पना होती का आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याची उत्तरे आता या फेरचौकशीतून मिळण्याची अपेक्षा आहे.


No comments:
Post a Comment