Mumbai Rain - मुंबईत २४ तासांत जुलैच्या सरासरीपैकी ७४ टक्के पाऊस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2026

Mumbai Rain - मुंबईत २४ तासांत जुलैच्या सरासरीपैकी ७४ टक्के पाऊस


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. ४ जुलै :
मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जुलै महिन्याच्या सरासरी पावसापैकी तब्बल ७४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत शहर आणि उपनगरांमध्ये २५० ते ३०० मिलीमीटर पाऊस झाला असून, विक्रोळी येथे सर्वाधिक ३१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही यंदाच्या मान्सूनमधील सर्वाधिक नोंद असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली.

महापालिकेनुसार, गेल्या चार दिवसांत मुंबईत ५८८ मिमी पाऊस झाला असून, तो जुलै महिन्याच्या सरासरीच्या ७४ टक्के आणि वार्षिक सरासरी पावसाच्या सुमारे २५ टक्के इतका आहे. शनिवारी दुपारी समुद्राला ४.२६ मीटर उंचीची भरती असतानाही मुंबईतील जनजीवन मोठ्या प्रमाणात सुरळीत राहिले. रेल्वे वाहतुकीवर कोणताही मोठा परिणाम झाला नाही.

मात्र, मुसळधार पावसामुळे शहरात १० हून अधिक सखल भागांमध्ये पाणी साचले, तर झाडे व फांद्या पडण्याच्या १०३ तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या. त्यापैकी १८ झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तसेच १७ घरे व भिंती कोसळल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भांडूप (पश्चिम) येथील लालबहादूर शास्त्री मार्गालगत एका खाजगी विकासकाच्या बांधकामस्थळी खोदकामाचा भाग कोसळल्याची घटना घडली. या ठिकाणी महापालिकेने तातडीने बॅरिकेडिंग करून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना केल्या आहेत.

दरम्यान, पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे १० हजार अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी तैनात असून, वरिष्ठ अधिकारीही परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages