पालिकेतील दुरध्वनी चालकांची रिक्त पदे तातडीने भरा, कामगार सेनेची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2026

पालिकेतील दुरध्वनी चालकांची रिक्त पदे तातडीने भरा, कामगार सेनेची मागणी


मुंबई | जेपीएन न्यूज - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक विभागांमध्ये दुरध्वनी चालक (टेलिफोन ऑपरेटर) संवर्गातील तब्बल ३० पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. ही रिक्त पदे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांमधून तातडीने भरावीत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त किशोर गांधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

डॉ. कांबळे-बापेरकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, पालिकेने २०१६ नंतर दुरध्वनी चालक पदभरतीची कोणतीही प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे पालिकेची रुग्णालये, पाणीपुरवठा विभाग, विभागीय कार्यालये तसेच इतर अत्यावश्यक खात्यांमध्ये या पदांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे.

या रिक्त पदांबाबत संबंधित विभागांनी सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठविले असतानाही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परिणामी, कार्यरत दुरध्वनी चालकांवर अतिरिक्त जबाबदारी येत असून प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पालिकेच्या अत्यावश्यक सेवांचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांमधून दुरध्वनी चालकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS