अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा – मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2026

अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा – मुख्यमंत्री


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, दि. ६ जुलै :
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. राज्याची संपूर्ण शासकीय यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हवामानातील बदलामुळे अतिवृष्टी, दरडी कोसळणे आणि जोरदार वारे यांसारख्या घटना वाढत असून शासनाने पूर्वतयारी केली असली तरी काही वेळा अपेक्षेपेक्षा वेगळ्या परिस्थिती निर्माण होतात. अशा प्रत्येक घटनेत महानगरपालिका, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि इतर संबंधित विभाग तातडीने मदतकार्य करत आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक भागांमध्ये वाहतूक वळविणे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे तसेच पाण्यात अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, संभाव्य धोका लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसांत धोकादायक ठिकाणांतील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

आज दुपारनंतर राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस आणि ताशी वेगाने वारे वाहण्याचा इशारा असल्याने नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः तरुणांनी पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर आणि इतर धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे सांगत, कोणत्याही परिस्थितीत मदतकार्यात कमतरता राहू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

तसेच, गेल्या काही दिवसांतील पावसामुळे घडलेल्या घटनांचा, मदतकार्याचा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल विधानसभेत उद्या सादर करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS