मुंबईतील खासगी कर्मचाऱ्यांना Work From Home, सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2026

मुंबईतील खासगी कर्मचाऱ्यांना Work From Home, सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी


मुंबई | जेपीएन न्यूज डेस्क, ६ जुलै :
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरातून काम (Work From Home) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे तसेच झाडाखाली वाहने उभी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी समुद्रकिनारे आणि पाणथळ भागात जाणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेने सांगितले की, सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी विविध विभागांमध्ये अहोरात्र कार्यरत असून वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजनांचे समन्वयन करत आहेत.

दरम्यान, मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विकासक, कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी विशेष सुरक्षा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. बांधकाम स्थळांवरील स्कॅफोल्डिंग, क्रेन, टॉवर क्रेन, बांधकाम लिफ्ट, सुरक्षा जाळ्या, पत्रे, फॉर्मवर्क आणि इतर तात्पुरत्या संरचनांची तातडीने तपासणी करून त्या सुरक्षित असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, हवामानामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास उंचावरील सर्व कामे आणि लिफ्टिंग ऑपरेशन्स तात्काळ थांबवावीत, तसेच कामगारांनी वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) वापर करणे बंधनकारक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages