Lad Page Committee च्या शिफारसींना गती; ५०० सफाई कर्मचाऱ्यांना लवकरच नियुक्ती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2026

Lad Page Committee च्या शिफारसींना गती; ५०० सफाई कर्मचाऱ्यांना लवकरच नियुक्ती


नागपूर | जेपीएन न्यूज | १२ जुलै - 
सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार आणि नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असून, महानगराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार लवकरच सुमारे ५०० सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी) अंतर्गत 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर, उपमहापौर लिला हातीबेड, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, माजी महापौर दयाशंकर तिवारी तसेच महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महर्षी सुदर्शन वाल्मिकी यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या वसाहतीचे काम उच्च दर्जाचे व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. तसेच प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी महत्त्वाची योजना असून, आगामी काळात राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.

९१० घरांची उभारणी - 
नागपूर महानगरपालिकेतर्फे मौजा नारी येथे उभारण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहतीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी १४ इमारतींमध्ये २ बीएचकेच्या ३९२ सदनिका बांधण्यात येणार आहेत.

तसेच प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १ आणि २ बीएचकेच्या ५१८ परवडणाऱ्या सदनिकांची उभारणी करण्यात येणार आहे.

दोन्ही प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, या वसाहतींमध्ये उद्यान, पाणीपुरवठा, सौरऊर्जा प्रणाली, खेळाचे मैदान, सुरक्षा व्यवस्था यांसह सर्व आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS