
मुंबई | जेपीएन न्यूज - महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी BMC MARD आणि Central MARD यांच्या शिष्टमंडळाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी डॉक्टरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली.
शिष्टमंडळात डॉ. शंकर जगताप (सरचिटणीस), डॉ. विशाल मुले (शैक्षणिक सचिव), डॉ. रवी सपकाळ, डॉ. आयुषी बाफना, डॉ. अथर्व शिंदे (अध्यक्ष, Central MARD), डॉ. विनायक शाह (सरचिटणीस, Central MARD) आणि डॉ. महेश टिकडे यांचा समावेश होता.
निवेदनात निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये वाढ, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) रकमेचे वेळेवर वितरण, MUHS परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी प्रक्रिया जलद करणे, एकसमान TA/DA धोरण लागू करणे, रुग्णालयांतील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे, सर्वसमावेशक आरोग्य विमा उपलब्ध करून देणे आणि वसतिगृहांच्या सुविधांचे आधुनिकीकरण या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
आदित्य ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांचे प्रश्न लक्षपूर्वक ऐकून घेत हे प्रश्न संबंधित शासकीय यंत्रणांकडे प्रभावीपणे मांडण्याचे आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
BMC MARD ने आदित्य ठाकरे यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करत निवासी डॉक्टरांचे कल्याण, सुरक्षितता आणि राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाशी सातत्याने संवाद सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.


No comments:
Post a Comment