महापौरांच्या कारभाराविरोधात किशोरी पेडणेकरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2026

महापौरांच्या कारभाराविरोधात किशोरी पेडणेकरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार


मुंबई | जेपीएन न्यूज - मुंबईतील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत बृहन्मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या तथा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापौरांच्या कारभाराविरोधात तक्रार केली. मुंबईकरांच्या हिताचे प्रश्न वेळोवेळी मांडूनही महापौर कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. शिष्टमंडळात आमदार सुनील प्रभू, अनिल परब, सुनील शिंदे, अजय चौधरी आणि महेश सावंत यांचा समावेश होता.

किशोरी पेडणेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे झाडे कोसळणे, इमारतींच्या दुर्घटना, रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व बाबींबाबत महापौरांना वारंवार पत्रव्यवहार करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतेही लेखी उत्तर किंवा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

मुंबईकरांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करून महापौरांना आवश्यक निर्देश द्यावेत, तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीतील नागरिकांना सुरक्षित आणि अखंड नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही पेडणेकर यांनी निवेदनात नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS