संजय राऊतांनी भावनिक राजकारण थांबवावे – ॲड. अमोल मातेले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2026

संजय राऊतांनी भावनिक राजकारण थांबवावे – ॲड. अमोल मातेले


मुंबई | जेपीएन न्यूज - विधान भवनात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून टीका करणारे खासदार संजय राऊत यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार पलटवार केला आहे. लोकशाहीत संवाद महत्त्वाचा असून, शरद पवार यांच्या राजकीय निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर कोणत्याही घटनात्मक पदावरील व्यक्तीशी चर्चा करणे ही लोकशाहीची परंपरा आहे. त्यातून कोणाला प्रतिष्ठा मिळते किंवा कोणाचा अपमान होतो, असा प्रश्नच निर्माण होत नाही.

संजय राऊत यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून व्यक्त केलेली नाराजी ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला. पूर्वी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधला तेव्हा त्याला राजकीय मुत्सद्देगिरी म्हटले जात होते, मात्र आता त्याच संवादावर टीका केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीचा पाया इतका कमकुवत असेल की एका भेटीने तो हादरेल, तर त्याचा विचार संबंधित पक्षांनी करावा, असा टोला मातेले यांनी लगावला. राजकारणात संवादाचे दरवाजे कायम खुले ठेवावे लागतात आणि परिस्थितीनुसार सर्व पक्षांशी चर्चा करावी लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राऊत यांनी रोज भावनिक विधाने करण्यापेक्षा आपल्या पक्षातील संघटनात्मक प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला देत मातेले यांनी शरद पवार यांच्या राजकीय परिपक्वतेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages