पालिकेची तीनही नवी रुग्णालये खासगीकरणाविना सुरू करा - किशोरी पेडणेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 July 2026

पालिकेची तीनही नवी रुग्णालये खासगीकरणाविना सुरू करा - किशोरी पेडणेकर


मुंबई | जेपीएन न्यूज - 
पश्चिम उपनगरातील सिद्धार्थ रुग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालय आणि श्री. हरिलाल भगवती रुग्णालय ही अत्याधुनिक रुग्णालये बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतःच चालवावीत आणि त्यांचे कोणत्याही खासगी संस्थेकडे संचालन देऊ नये, अशी ठाम भूमिका महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडली. या रुग्णालयांच्या खासगीकरणाला शिवसेनेचा तीव्र विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

किशोरी पेडणेकर यांनी गोरेगाव, कांदिवली आणि बोरिवली येथील तिन्ही रुग्णालयांची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार विलास पोतनीस, माजी आमदार विनोद घोसाळकर, विभागप्रमुख अंकित प्रभू, नगरसेवक साईनाथ दुर्गे, नगरसेविका सारिका झोरे, माजी नगरसेवक उदेश पाटेकर आदी उपस्थित होते.

पेडणेकर म्हणाल्या की, सुमारे ₹५०० कोटींचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयांची ८० ते ८५ टक्के कामे पूर्ण झाली असून आता केवळ हस्तांतरणाची प्रक्रिया बाकी आहे. केईएम, नायर आणि सायनसारख्या प्रमुख रुग्णालयांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी ही रुग्णालये तातडीने जनतेच्या सेवेत दाखल करणे आवश्यक आहे.

त्यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या खासगीकरणाचा प्रयत्न करत आहेत. मुंबईकरांच्या करातून उभारलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयांचे व्यवस्थापन खासगी संस्थांकडे देणे सर्वसामान्यांच्या हिताविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले.

महानगरपालिकेकडे अनुभवी डॉक्टर, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी आणि सक्षम आरोग्य व्यवस्था असल्याने केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयांप्रमाणेच या तीन नव्या रुग्णालयांचे संचालनही पालिकेनेच करावे, अशी मागणी त्यांनी केली.

रुग्णालयांतील निरीक्षणे -
सिद्धार्थ रुग्णालय, गोरेगाव: १८२ वरून ३०६ खाटांची क्षमता वाढविण्यात आली असून कॅथलॅब, केमोथेरपी, ICU, MICU, CT-MRI आदी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालय, कांदिवली: ३२४ खाटांचे काम अंतिम टप्प्यात असून औषध पुरवठ्यात विलंब, १३ वर्षे जुनी एमआरआय मशीन आणि परिचारिकांची कमतरता असल्याच्या तक्रारी समोर आल्या.

हरिलाल भगवती रुग्णालय, बोरिवली: रुग्णालयाची क्षमता ३७३ वरून ४९० खाटांपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र वाढलेल्या क्षमतेनुसार डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्याची गरज असल्याचे पेडणेकर यांनी नमूद केले.

पेडणेकर यांनी सांगितले की, मुंबईकरांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही तीनही रुग्णालये कोणताही विलंब न लावता सुरू करावीत आणि त्यांचे संचालन पूर्णपणे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडेच ठेवावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS