धारावी बस डेपो पीपीपी तत्त्वावर देण्यास काँग्रेसचा विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 July 2026

धारावी बस डेपो पीपीपी तत्त्वावर देण्यास काँग्रेसचा विरोध


मुंबई | जेपीएन न्यूज -
धारावी बस डेपोची सुमारे ११.५ एकर जागा सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर खासगी विकासकाला देण्याच्या प्रस्तावाला महापालिका काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. ही मुंबईकरांची मौल्यवान मालमत्ता असून ती कोणत्याही खासगी विकासकाच्या ताब्यात देऊ नये, तर महापालिकेने स्वतःच तिचा विकास करावा, अशी ठाम भूमिका महापालिका काँग्रेस गटनेते अशरफ आजमी यांनी मांडली.

महापालिका सभागृहात प्रसारमाध्यमांशी बोलताना आजमी म्हणाले की, धारावी बस डेपोचा विकास पीपीपी तत्त्वावर करण्याचा प्रस्ताव सभागृहात आला असला, तरी काँग्रेस पक्ष त्याला कडाडून विरोध करणार आहे. संबंधित विकासकाचा अदानी समूहाशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी मुंबईकरांच्या मालकीची जमीन खासगी हातात देण्यास विरोध असल्याचे स्पष्ट केले.

आजमी यांनी माहीम बस डेपोच्या जागेचे उदाहरण देत सांगितले की, यापूर्वी महापालिकेने ती जागा खासगी विकासकाला दिली होती. मात्र, विकासकाने महापालिकेला देय असलेली सुमारे ९८ कोटी रुपयांची रक्कम अद्याप दिलेली नाही. आज त्या जागेची किंमत ४०० ते ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. धारावीतही अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी हा प्रस्ताव रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

धारावी पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आधीच विविध शंका निर्माण झाल्या आहेत. अशा वेळी बस डेपोची जागाही खासगी विकासकाला देण्याचा निर्णय योग्य नसून, महापालिकेने स्वतः हा प्रकल्प विकसित केल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो आणि मुंबईकरांच्या हिताचे संरक्षण होईल, असेही आजमी यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी चेंबूरमधील वृक्ष दुर्घटनेचा मुद्दाही उपस्थित केला. अशा गंभीर घटनांवर चर्चा करण्याऐवजी प्रशासन इतर विषयांना प्राधान्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिका आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळत असल्याचा निषेध म्हणून काँग्रेस नगरसेवकांनी सभात्याग केल्याची माहितीही आजमी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS